मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला ! भाजप १४०, शिवसेना शिंदे ८७ पवारांच्या राष्ट्रवादीची आज उद्धव ठाकरेंश चर्चा

Foto
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत जागावाटपासाठी चर्चेच्या फेर्‍या सुरु आहेत. या चर्चेअंती आता भाजप आणि शिंदे सेनेच्या मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका  निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी भाजप १४० आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना ८७ जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून २२७ जागा लढवणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा आता कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
 
यापूर्वी जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदे गटासाठी फक्त ५२ जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने आता शिवसेनेला जास्त जागा देऊ केल्या होत्या. परंतु, जागावाटपच्या या सूत्रावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 
दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेकडे ३१ जागा तर काँग्रेसकडे २९ जागांचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान आजच्या चर्चेनंतर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाण्याचा निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचं वेट अँड वॉच

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून अद्याप एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून वेट अँड वॉच धोरण अवलंबण्यात आल्याची चर्चा आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, पनवेलमधील जागावाटपाचा पेच कायम आहे. उद्यापर्यंत या सर्व ठिकाणचे जागावाटप पूर्ण होईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांसाठी मतदान

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणार्‍या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर  झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २२७ प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च, २०२२ रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक २०१७ रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.

शरद पवारांचे उमेदवारही जाहीर 

दरम्यान मुंबई महापालिकासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती जाहीर झाली असताना शरद पवारांची राष्ट्रवादीने ठाकरे गटासह काँग्रेससोबतच्या युतीचा पर्याय खुला ठेवला आहे. याचदरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची नावे एबीपी माझाच्या हाती लागली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ६ संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
 
जयंत पाटील आज उद्धव ठाकरेंची घेणार भेट

आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबत आघाडीसंदर्भात चर्चेची शेवटची फेरी पार पडणार आहे. आज दुपारी १ वाजता जयंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत आघाडी आणि जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत.